पावसाळ्यातील सौंदर्य


    


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

हिल्या पावसाच्या एका एका थेंबा बरोबर उन्हाळ्यातील प्रखर उन्हाचे चटके सहन करून भेगाळलेल्या जमिनीची तहान भागत असते. मातीचा दरवळणारा सुगंध याची साक्ष देतो जणू तिच्या  तृप्ततेची ती ढेकरच असते. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधून पावसाची रिपरिप पडल्याबरोबर आभाळात न मावेल असा आनंद ओसंडून वाहत असतो. हळूहळू जमीन हिरवीगार व्हायला लागते. जमिनीची तहान भागल्यानंतर डबकी, नद्या,ओढे यांच्यामध्ये पाणी साठू लागतं. डबक्यामधल्या पाण्यामध्ये होड्या करून लहान मुलांचे खेळ रंगू लागतात. झाडांच्या पानापानांवर रात्रभर पडलेल्या पावसाचे थेंब दबा धरून बसलेले असतात. अवखळ पोरांचे मग त्या झाडाखाली एखाद्याला न्यायचं आणि झाडाला जोरात हिसका देऊन त्याला  'शॉवर बाथ' द्यायचे खेळ रंगतात.

एखाद्यावेळी अतिवृष्टी होते. गावातील सारे ओढे,नाले तुडुंब भरून लागतात. अनेक घरं अगदी चाळणी प्रमाणे गळू लागतात. ओढे-नाले यांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे म्हणून गावाचा संपर्क तुटतो. गावकऱ्यांना चर्चेला पुन्हा एक नवीन विषय मिळतो. पुढचे काही दिवस तर या पुराच्या पाण्याची चर्चाच रंगणार असते. गावातली जेष्ठ,वृद्ध मंडळी त्यांच्या काळातील किस्से सांगून आताच्या पाण्याची तुलना करताना दिसतात. निसर्ग यातूनही एक मोठा संदेश देऊन जातो... एक धडा देऊन जातो... ओढा- नाल्यांवर झालेली अतिक्रमणं आपल्या सोबत घेऊन जातो.. आणि माणसांनी केलेल्या चुका सुधारण्याची आणखी एक संधी देऊन जातो..

सौदागर काळे,पंढरपूर.

पाऊस झोपडीमध्ये पडत असतो.झोपडी जुनी झाल्याने गळत असते.जिथून पाणी टिपकत असते,त्याखाली भांडी ठेवली जातात. रिकाम्या भांड्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज ते काठोकाठ भरत आलेल्या पातेल्यात पडणाऱ्या थेंबांचा आवाज वातावरणात  एक नाद,संगीत तयार करत राहते.हे सौंदर्य झोपडीमालक-मालकीण रात्रभर ऐकत असतात.

रात्रभर सुसाट्याचा पाऊस पडलेला असतो.भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो.ज्या भाबळीला  सुगरणी चिमण्यांचे घरटं होतं ते आता तुटून खाली पडलं होतं.लहान मूलांनी सकाळ सकाळ ते कुतूहल म्हणून खेळण्यासाठी घेतलं आहे.चिमण्यां नविन सौंदर्य तयार करण्यासाठी पुन्हा कामाला लागल्या आहेत.

अनिल गोडबोले,सोलापूर

पावसाळा हा ऋतू अतिशय रोमँटिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याला बहार येतो. सगळी कडे हिरवळ आणि चैतन्य देणारे वातावरण असल्यामुळे, आनंददायी वातावरण असते.

मला आठवत की हायस्कूल ला जात असताना साधारण पणे 7 ते 8 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. कोकणात अजूनही दळणवळणाची साधन फारशी वाढलेली नाहीत. खेडेगावात चालत फिरावं लागत.. त्याचा फायदा असा की सर्व आजूबाजूच्या गोष्टी निरखत, बघत निवांत चालत जायचो.

कोकणात पावसाळ्याचे रौद्र रूप असतेच पण त्या सोबत.. सतत पडणाऱ्या पावसात चालण्याचा आनंद वेगळाच..!

तेव्हा शाळेत जायची घाई नासायची आणि घरी यायची पण.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत आणि झुडुपात येणारी विविध फुल व याच्यावर पडणारे पावसाचे थेंब अजूनही आठवले की मन डायरेक्ट हायस्कूल मध्ये जाते.

छोट्या छोट्या भिंगरी (हेलिकॉप्टर प्रमाणे उडणारे कीटक) पकडायचो. फुलपाखरं तर भरपूर दिसायची.. आता कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र शिकताना फोटो बघितला की ते नवीन अस कधी वाटत नाही. सर्व प्रकारची फुलपाखरं अजूनही माझ्या गावात आहे. आता तर त्यावर काहीजण अभ्यास करत आहेत.

शाळेत जाताना छत्री नावालाच असायची.. म्हणजे पावसात भिजायचं, हे नक्की असायचं.. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असायची ती म्हणजे पावसाळी सँडल..! पाण्यात पायाखाली काय येईल हे सांगता येत नसे..

मध्येच एखादा ससा टुणकन उडी मारून निघून जाई.. शेतात चालू असलेली काम व त्यात काम करणाऱ्या बायकांची लोक गीते चालू असायची.. डोक्यावर इरले घेऊन भात शेती मध्ये काम चाललेलं असायचं..

एकदा तर सापावर पाय पडता पडता राहिला. नंतर कळलं की, तो साप म्हणजे नाग होता. गावाच्या बाजूने तेरेखोल ची खाडी गेलेली आहे.. पावसाळ्यात ही गोड्या पाण्याची असते इतर वेळी समुद्राचे पाणी यात येते.. त्या नदीचा आवाज.. पक्षी यांचे आवाज कानात अजूनही बसलेले आहेत..

असो, आता अजून काय वर्णन करावे, बा. भ. बोरकर सांगतात त्या प्रमाणे, "माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे.. कड्या कपारी मधोनी, घट फुटती दुधाचे."

मला माहित आहे, वरील कविता आपण चाल लावूनच वाचली असणार, तर माझ्या मनात पावसाळा अत्यंत निसर्गाने भरलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************